प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे
प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

30 November 2010

श्रीसंग कार्यकारी मराठी प्रकल्प

          श्रीसंग कार्यकारी मराठी हा प्रकल्प मराठी भाषेची नाळ संगणक तंत्रज्ञानाशी पक्की करण्यासाठी सुरू करण्यात आला. या प्रकल्पात संगणकीय वापरासाठीची मूलभूत साधने मराठी भाषेत तयार करण्याचे योजण्यात आले. संगणकाच्या अफाट विश्वाची गुरुकिल्ली असणार्‍या संगणक भाषेची (प्रोग्रामिंग लँग्वेजची) निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला. याचेच फलित म्हणजे "श्रीसंग कार्यकारी मराठी" (श्रीकाम) ही संपूर्णपणे मराठी संगणक भाषा (प्रोग्रामिंग लँग्वेज) होय.

पार्श्वभूमी:

          कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही काही आभाळातून खाली पडलेली नसते. राष्ट्राच्या प्रगतीला कारक विविध घटकांचा जसजसा विकास साधला जातो तसतशी प्रगती होत जातेच. गरज असते ती असे घटक नेमकेपणाने ओळखण्याची. मराठी संगणक भाषा हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रगती आणि विकासाला कारक घटक आहे.

          जगातील सर्व "विकसित" राष्ट्रांच्या प्रगतीमागची कारणे कधीच गुप्त नव्हती. तेथील लोकांचे अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटी यांच्या बरोबरीने आणखी एक समान दुवा त्यामागे होता आणि आजही आहे. तो म्हणजे त्या सर्वांनी त्यांची भाषा ही संगणक भाषा म्हणूनही विकसित केली.

          जगातील सर्व "विकसित" राष्ट्रांमध्ये तेथील लोकांच्या भाषेतच संगणकाचे कामकाज चालते. कारण काय? उत्तर एकच: त्यांनी त्यांची भाषा ही संगणक भाषा म्हणून विकसित केली. त्यामुळे त्यांना सहजतेने, गरजेनुसार त्यांच्या भाषेत संगणक कार्यक्रम/सामग्री तयार करता येते. अर्थात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी, जेथे जेथे म्हणून संगणकाचा वापर होतो आणि होऊ शकतो, तेथे तेथे त्यांची सोय आणि फक्त सोयच झाली. त्यांच्या भाषेत संगणकाचे कामकाज करणे शक्य झाल्यामुळे साहजिकच लाखो स्थानिक लोकांनाच संबंधित नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी मिळाल्या. त्यांच्या संगणक भाषेचे प्रशिक्षण देणार्‍या संगणक अभियांत्रिकीच्या नव्या शाखा अस्तित्त्वात आल्या. यशाचे अनेक मार्ग मोकळे झाले. ही नेहमीच उघडपणे दिसून येणारी वस्तुस्थिती आहे.

आपली गतकाळातील स्थिती:

          लोकांची भाषा हीच जेव्हा संगणक भाषा झालेली नसते तेव्हा त्यांना या शाश्वत विकासाकडे नेणार्‍या साखळीतील एक सशक्त कडी गहाळ असल्याचे कळूनच येत नाही. या स्थितित त्यांना परकीय भाषेतील संगणक सामग्रीचा आधार घेणे भाग पडते. या परकीय भाषेतील संगणक सामग्रीच्या उपलब्धतेवर आणि वापरावर स्थानिक लोकांचे नियंत्रण नसते. या परकीय भाषेतील संगणक सामग्रीवरच अवलंबून असलेल्यांना अनेकवेळा त्यामागेच फरफटत जाणे भाग पडल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. म्हणजे संगणक आपला, त्यासाठीचा सर्व खर्च आपण सोसायचा पण तो कशा प्रकारे वापरायचा हे मात्र आपल्या हाती नाही.

          यावर उपाय काय?  यावर ठोस उपाय म्हणजे मराठी भाषा हीच संगणक भाषा बनवणे. हे काम प्रदीर्घ मेहनतीचे जरूर आहे, पण शक्यही आहे.

केले की होते!

          जगभरातील मराठी लोकांची हीच मूलभूत गरज भागवण्यासाठी संगणकतज्ज्ञ श्रीनिवास काळे यांनी "श्रीसंग कार्यकारी मराठी" (श्रीकाम) या पूर्णपणे मराठीतील संगणक भाषेची निर्मिती केली. ही संगणक भाषा आधुनिक संकरित वर्गातील आहे. त्यात तयार केलेले कार्यक्रम हे अत्यंत लवचीकतेने संगणकाची यंत्रणा हाताळतात. जगातील विभिन्न संगणकांवर समान प्रकारे काम करता येणे असे त्यांचे मूळ तत्त्व आहे. यानुसार एकदा एका संगणकासाठी कार्यक्रम तयार केला की कुठलाही बदल न करता पूर्णपणे वेगळ्या संगणकावर तो जशाचा तसा वापरणे शक्य होते (डिवाइस इंडिपेंडंट प्रोग्राम).

अमृतातेही पैजा जिंके...

          "श्रीसंग कार्यकारी मराठी" (श्रीकाम) हे संगणक भाषा म्हणून विकसित करण्यात आलेले मराठी भाषेचे प्रगत रुप आहे. या संगणक भाषेच्या माध्यमातून मराठी कार्यक्रम तयार करणे आता अत्यंत सहजसोपे झाले आहे. विशेष म्हणजे यातील सर्व आज्ञांची नावे ही मराठी भाषेत आधीपासूनच प्रचलित असलेले अर्थपूर्ण शब्द आहेत. त्यांचा तत्काळ अर्थबोध होतो. मराठी संगणक कार्यक्रमाचे संपूर्ण लिखित (सोर्सकोड) देवनागरी मराठी लिपितूनच तयार करता येणे आता शक्य झाले आहे.

          "श्रीसंग कार्यकारी मराठी" (श्रीकाम) या संगणक भाषेच्या द्वारे सर्वच क्षेत्रातील (जसे व्यवसायिक, वैज्ञानिक, औद्योगिक, घरगुती, इ.) विविध संगणकीय कार्यक्रमसंबंधी गरजांची परिपूर्तता करता येते. तसेच भविष्यात संगणक क्षेत्रात निर्माण होणारी नवनवीन आव्हाने स्वीकारण्यास ही संगणक भाषा पुरेशी लवचीक आहे.

4 comments:

Siddhu said...

Heartly congratulations for being such a loyal to your childhood ambitions, there are very few like you, many of them become scientists. I know you have been working on this for quite a long period of time. I would suggest you to keep this blog highly acquainted with latest topics and with changes in technology and at par with new inventions that keep on happening in your field. I can imagine and could percept that for you it would be really interesting and proud to see after coming so far, the person standing at the next horizon greets you in Marathi. I wish you pass through many doors like these and make our language truely universal..

Anonymous said...

हि फक्त कल्पना आहे कि या प्रोजेक्ट वर तुम्ही काम करताय?
कि हा प्रोजेक्ट पूर्ण झालाय?

जर हा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे तर मग याविषयीची आणखी माहिती डेमो वगैरे कुठे मिळेल?

Shrinivas Kale said...

नमस्कार अनामिक! श्रीसंग कार्यकारी मराठी हा बहुद्देशीय प्रकल्प आहे. यातील पहिला टप्पा "श्रीसंग कार्यकारी मराठी, संगणक भाषा" या संपूर्णपणे मराठीतून संगणकीय प्रोग्रामिंग करता येणार्‍या प्रोग्रामिंग लॅंग्वेजचे काम पूर्ण झालेले आहे.

Shrinivas Kale said...

या ब्लॉगच्या सर्व सन्माननीय वाचकांना विनंती आहे की आपण आपले सर्व प्रश्न shreekaam@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावेत. आपणास तपशीलात माहिती देणे त्यामुळे शक्य होईल.